Logo

बोनसचे नियोजन

बोनसचे नियोजन

आर्थिक नववर्षाची सुरुवात करून देणारा एप्रिलचा महिना बहुसंख्य नोकरदारांसाठी काही विशेष महत्त्वाचा असतो. सर्वसाधारणपणे ह्याच सुमारास त्यांचे वार्षिक अप्रैजल झालेले असते आणि त्यानुसार वार्षिक बोनस मिळणार असतो व पुढील वर्षासाठीची पगारवाढ ठरणार असते. बोनस किंवा तत्सम इतर कुठलाही एकरकमी मोठा निधी हातात आला की त्याच्या खर्चाला वाटा फुटायला वेळ लागत नाही. तसे होऊ नये यासाठी अशा ‘लम्प-सम’च्या गुंतवणुकीचा विचार प्रत्येकाने आधीपासूनच करावा.

आपण दरमहा आपल्या उत्पन्नातून गुंतवणूक करतच असतो. ती सहजी होऊन जात असते आणि त्याचा आपण विचार आणि नियोजन केलेले असते. (नसेल केलेले तर ते आधी करा.) मात्र एखादी मोठी रक्कम एकदम मिळाल्यावर त्याचे काय करावे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. इक्विटी म्युच्युअल फंडात टाकावेत का? एकदम टाकावेत की हळूहळू टाकावेत? आपण इक्विटी मधे गुंतवले आणि नंतर मार्केट पडलं तर? त्यापेक्षा बँकेच्या मुदतठेवीत ठेवावेत का? की चालु असलेलं कुठलं कर्ज फेडण्यासाठी त्याचा वापर करावा? असे अनेक प्रश्न पडू शकतात.

प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाची परिस्थिती वेगवेगळी असते त्यामुळे या बाबतीत खरंतर वैयक्तिक पातळीवर आपापल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणं कधीही जास्त संयुक्तिक. पण या लेखात आपण काही प्रमुख पर्याय पाहूयात.

सर्वात प्रथम म्हणजे गृहकर्ज सोडून इतर कुठलेही कर्ज काढलेले असेल, उदाहरणार्थ, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्डावरील कर्ज इत्यादी, आणि त्यात लवकर परतफेडीवर दंड नसेल तर त्यांच्या परतफेडीला प्राधान्य दिले पाहिजे. कारण ही सर्व कर्जे महागडी असतात आणि भविष्यातील अनिश्चित परताव्याच्या मागे लागण्यापेक्षा आजचा नक्कीचा खर्च कमी करणे कधीही चांगले.

गृहकर्ज मात्र याला अपवाद ठरू शकतं कारण ते आपल्याला मिळू शकणारं सर्वात स्वस्त कर्ज आहे आणि त्यावर करवजावट देखील मिळते.

बऱ्याचदा लोक असे पैसे ‘सुरक्षितठेवण्याच्या उद्देशाने ‘त्याचे नक्की काय करायचे ते ठरवेपर्यंत मुदतठेवीत ठेऊअसे म्हणून बँकेच्या मुदतठेवीचा पर्याय निवडतात. मात्र ही तात्पुरती उपाययोजना असू शकते, कायमची नाही. कारण बँकेच्या मुदतठेवी दीर्घकाल केल्यास महागाई आणि टॅक्स यांच्या एकत्रित प्रभावामुळे मूल्यनाशक ठरतात.

त्यामुळे आपल्याला हे ठरवले पाहिजे की हा निधी आपल्याला दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आरक्षित ठेवायचा आहे की लघुकालीन किंवा आकस्मिक कारणांसाठी. मागे सुचवल्याप्रमाणे जर आपला इमर्जन्सी फंड तयार नसेल तर त्या उद्दिष्टासाठी हा निधी वापरणे नक्कीच उत्तम ठरेल. म्हणजेच म्युच्युअल फंडातील एखाद्या लिक्विड प्रकारातील योजनेत कधीही वापरता येईल अशा प्रकारे साठवणे. सुमारे ८-१० महिन्यांचा खर्च भागू शकेल एवढा तरी निधी अशा इमर्जन्सी फंडमधे ठेवणे उपयोगी ठरते.

पण जर इमर्जन्सी फंड देखील तयार आहे आणि त्यात भर घालायची जरुर नाही असे असेल तर मग हे पैसे आपल्या दीर्घकालीन इक्विटी योजनांमधील गुंतवणुकी वाढवण्यासाठी वापरता येऊ शकतात. पण मग आपण एकदम मोठी रक्कम गुंतवली आणि नंतर मार्केट पडले तर?

ही ‘मार्केट पडले तरची जोखीम आपण इक्विटी योजना निवडतानाच घेतलेली असते. आणि म्हणूनच दीर्घकालीन करायच्या गुंतवणुकीच आपण तिथे करत असतो. ही जोखीम का घ्यावी आणि त्याचा कसा विचार करावा याचं विवेचन मागच्या काही लेखात केले होते. १०-१२ वर्षे किंवा जास्त कालावधीचा विचार करून आपण गुंतवणूक करत असलो तर खरे बघायला गेल्यास आपण एकरकमी गुंतवणूक केली की दरमहा थोडी थोडी केली, फारसा फरक पडणार नसतो.

मात्र आपल्या एकंदर गुंतवणुकीपेक्षा फार मोठी रक्कम गुंतवायची असल्यास मानसिक दडपण येऊ शकते. अशा वेळी ती रक्कम लिक्विड फंडात ठेवून दरमहा किंवा प्रत्येक आठवड्याला थोडी थोडी अशा पद्धतीने १२-१८ महिन्यात इक्विटी फंडात गुंतवू शकतो. आता कोणी असा प्रश्न उपस्थित करू शकतो की आपला १२-१८ महिन्यांचा गुंतवणूक काळ संपला आणि मग मार्केट पडले तर? अशा कुतर्कांना कधीच अंत नाही. कारण मार्केट पडेल अशा भीतीने आपण वाट बघत बसलो आणि मार्केट वरवरच जात राहिले तर?

शेवटी एक गोष्ट मान्य करून आपल्याला पुढे जावे लागेल ती म्हणजे आपण कुठलाही निर्णय घेतला तरी आपल्याला भविष्यात कदाचित ‘अरेरे, असे कशाला केले? तसे का नाही केले?’ अशा पश्चात्तापाच्या विचाराशी सामना करावा लागू शकतो. नजीकच्या भविष्यात मार्केट कसे वागेल याचा अचूक अंदाज सातत्याने कोणीच कधीच बांधू शकला नाहीये. त्यामुळे आपल्याला झेपेल एवढीच जोखीम पोर्टफोलिओमधे कशी राहील त्याचा विचार करून आणि डेट-इक्विटीचा तोल सांभाळून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

मोठ्या निधीच्या गुंतवणुकीच्या बाबतीत एक मोठी जोखीम जी आपण लक्षात घेत नाही ती म्हणजे ‘निष्क्रियता. अनेकदा आपण ‘चूक झाली तरकिंवा ‘मार्केट पडले तरच्या तावडीत सापडून काहीच निर्णय न घेणे हा सोप्पा पर्याय निवडतो किंवा ‘नंतर करू’ असं म्हणून कालापव्यय करत राहतो. आणि मग पैसे बचत खात्यात पडून राहतात आणि खर्च होतात किंवा मुदतठेवीत गुंतवले जातात. तेव्हा आधीपासूनच ‘बोनसची रक्कम कशी आणि कुठे गुंतवायची’ याचा विचार पक्का करून ठेवा.

 

---- प्राजक्ता कशेळकर